जिल्हा क्षयरोग केंद्र, भंडारा येथे जागतिक क्षयरोग दिन साजरा १०० दिवस सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन

भंडारा – सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत जिल्हा क्षयरोग केंद्र भंडारा येथे २४ मार्च जागतिक क्षयरोग दिन साजरा करण्यात आला. यावेळी क्षयरुग्णांना पोषक आहार कीटचे वाटप करण्यात आले. सर्व क्षयरुग्णांनी नियमित औषधोपचार घेऊन क्षयरोगापासुन पुर्णपणे बरे व्हावे असे आवाहन मा.डॉ. मिलींद सोमकुंवर, जिल्हा आरोग्य अधिकारी भंडारा यांनी केले. यावेळी १०० दिवस सक्रीय क्षयरुग्ण शोध मोहीमेचे जिल्हास्तरीय उद्घाटन मा. जिल्हा आरोग्य अधिकारी भंडारा यांचे हस्ते करण्यात आले. या मोहीमेअंतर्गत जिल्हयातील २२६ अतिजोखमीच्या गावांची निवड करण्यात आली. या गावातील १४ वर्षावरील सर्व लोंकांची क्षयरोगासाठी एक्स-रे काढुन तपासणी करण्यात येणार आहे. तसेच समुदाय आरोग्य अधिकारी यांचे मार्फत त्यांची ऑनलाईन निक्षय पोर्टल वर नोंद करण्यात येणार आहे. आयुष्यमान आरोग्य मंदिरामध्ये (AAM) तसेच जोखीमग्रस्त गावात “आयुष्यमान आरोग्य शिबीरे” आयोजित करुन रक्तदाब (BP), रक्तातील साखर, हिमोग्लोबीन तपासणीबरोबरच छातीचा एक्स-रे व NAAT तपासणी सेवा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत.या कार्यक्रमाला डॉ.अतुल टेंभुर्णे, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकीत्सक डॉ. अमरदिप नंदेश्वर, जिल्हा क्षयरोग अधिकारी, डॉ. हितेश तायडे, श्री अनिल बनकर, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी, श्रीमती ज्योती धारगावे, श्री सुशिल बंसोड व क्षयरोग विभागातील सर्व कर्मचारी, रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते.



