ताज्या बातम्या

कलमेश्वर शहराच्या प्रवेशद्वारावर खड्ड्यांचा सापळा; प्रशासनाचे दुर्लक्ष, अपघाताची भीती.           

महा विदर्भ टीव्ही डिजिटल     

अरविंद बनसोड ( 91 88887 22232 )

प्रतिनिधी, कलमेश्वर : शहराच्या सुरुवातीलाच, मटन मार्केटसमोर मुख्य रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी दर आठवड्याला मोठा आठवडी बाजार भरतो, त्यामुळे वाहनांची आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. तरीदेखील कलमेश्वर नगर परिषद प्रशासन व लोकप्रतिनिधी याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे.

स्थानिक नागरिकांच्या मते, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार घसरून पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. पावसाळ्यात या खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने त्यांची खोली लक्षात येत नाही, त्यामुळे अपघाताचा धोका अधिकच वाढतो. बाजाराच्या दिवशी तर परिस्थिती अधिकच गंभीर होते.

नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. “मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?” असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

शहराच्या मुख्य प्रवेशद्वारावरच अशी परिस्थिती असणे ही अत्यंत लाजिरवाणी बाब असून संबंधित अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी तात्काळ लक्ष घालून रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी जोर धरत आहे.

दरम्यान, प्रशासनाने वेळेत उपाययोजना न केल्यास नागरिकांकडून आंदोलनाचा इशारा देखील देण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *